टायर फुटल्याने कठडे तोडून कार २० फूट खोल कोसळली
गंगापूर, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गाने शिर्डी ते छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना चारकाची कारचे चाक फुटले. कार पुलावरील कठडे तोडून २० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर जखमी झाले. हुमेरा मोहसीन शेख (३१, रा. कल्याण), हरिम जुनेद अहमद (८, रा. ठाणे, मुंबई) अशी मयतांची नावे आहेत.
कल्याणहून हे कुटुंब छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने (एमएच ४ एफएफ ५८४०) या कारने समृद्धी महामार्गाने जात होते. डोणगाव परिसरातील ओढ्यावर उभारलेल्या पूल चॅनल क्र ४५६ जवळ रविवारी (दि.७) रोजी सकाळी ९.३० वाजता कारचे टायर फुटले. भरधाव वेगात असलेली कार समृद्धी महामार्गावरील कठडे तोडून २० फूट खाली कोसळली.
हा अपघात खूप भयंकर होता, असे प्रत्यक्षदर्शीनी या वेळी सांगितले.
अपघाताचा आवाज होताच नागरिक धावले. शिल्लेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गावरील कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारासाठी दाखल केले. हमेरा शेख व हरिम यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कारमध्ये दोन पुरुष, दोन महिला, मुलगा, दोन मुली असे सहा जण प्रवास करत होते. इतरांची नावे समजू शकली नाही. या घटनेची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.













